प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोपरगाव :राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असूनही कोपरगाव तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन वेळेत न सुटल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांना सहा ते सात दिवसांनी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर वेळापूर ग्रामपंचायतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता तहसीलदार सावंत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

कधीकाळी कोपरगाव तालुका “भारताचा कॅलिफोर्निया” म्हणून ओळखला जात होता. दस्तुरखुद्द भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ साली ही उपाधी या तालुक्याला दिली होती. मात्र गेल्या सहा ते सात दशकांत तालुक्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आज शेतीसाठीच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. ही प्रगती की अधोगती, असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे.
बारमाही शेती पाण्याची स्वप्ने भंगली असून ‘सीलिंग’च्या नावाखाली जमिनीही गेल्या. शहराला आजही चार दिवसांनी पाणी मिळते, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. ग्रामीण व दुष्काळी भागांची परिस्थिती तर आणखीनच बिकट आहे. मात्र यासाठी जबाबदार कोण, हा प्रश्न साध्या मतदारांना निवडणुकांमध्ये फारसा पडत नाही, हेही तितकेच कटू सत्य आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाणीटंचाईचा हा कळीचा मुद्दा गांभीर्याने मांडला गेला का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्याचे उत्तर नकारार्थीच ठरेल.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे गोदावरी उजव्या कालव्याच्या अगदी उशाला वसलेली वेळापूर ग्रामपंचायत आज पाणीटंचाईला सामोरी जात आहे. जानेवारी महिना नुकताच पहिला हप्ता संपत असताना उन्हाळ्याचे अजून किमान दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गोदावरी उजवा तट कालव्याचे आवर्तन वेळेत न सुटल्याने पिण्याच्या व वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दोन्ही अस्तित्वात असलेल्या विहिरींना पाणी उपलब्ध नसून नागरिकांना सात ते आठ दिवसांनी अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सरपंच वैशाली सतीश भोसले व ग्रामविकास अधिकारी डी. जे. वारुळे यांच्या सह्या असून तहसीलदारांनी आपल्या स्तरावरून पाहणी करून तातडीची व योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन वेळापूरच्या पाणीप्रश्नावर किती गांभीर्याने पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





