प्रतिनिधी | निवृत्ती पगार “एवन न्यूज महाराष्ट्र” कोळपेवाडी:कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरी काँक्रीटीकरणासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ९८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सध्या तयार केला जात असून, येवला शहरात उड्डाणपूल तसेच बाह्यवळण (बायपास/रिंग रोड) रस्त्याचा समावेश करावा, अशी स्पष्ट सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली आहे.
येवला शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला होता. कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव हा मार्ग चौपदरी व काँक्रीट करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी मांडली होती.
दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनीही दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत, येवला शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी बाह्यवळण रिंग रोडसह चौपदरी काँक्रीट रस्त्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व प्रयत्नांना यश येत अखेर कोपरगाव ते मालेगाव या ७६ किलोमीटर लांबीच्या चौपदरी काँक्रीट महामार्गासाठी ९८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव येथील ढोलकी टोल नाका बंद करण्यात आला असून, हा संपूर्ण मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
हा महामार्ग उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख दुवा असून, येवला शहरातून जात असल्याने येथे व्यापारी दुकाने, बाजारपेठा व दाट वस्ती आहे. परिणामी, या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत होता. वारंवार अपघात होत असल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर बाबुळगाव–अंगणगाव–पारेगाव मार्गे येवला शहरासाठी बाह्यवळण बायपास रस्त्याची जोरदार मागणी करण्यात येत होती. आता या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने येवलेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार, या प्रकल्पात येवला शहरात चौपदरीकरण, उड्डाणपूल, भूसंपादन तसेच बाह्यवळण रस्त्याचा समावेश करून सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर येवला शहर वाहतूक कोंडीतून मुक्त होईल, तसेच येवला हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे आणि मालेगाव या प्रमुख शहरांना जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





