प्रतिनिधी : निवृत्ती पगार
“एवन न्यूज महाराष्ट्र”कोळपेवाडी.
कोळपेवाडी:दि. 24 डिसेंबर पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा 2019 मध्ये तयार करण्यात आलेल्या मूळ प्रकल्प अहवालानुसारच (नारायणगाव–संगमनेर–अकोले–सिन्नर मार्गे) कार्यान्वित करण्यात यावा, अशी ठाम मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेच्या भावना थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी आग्रही विनंती केली आहे.
केंद्रीय रेल्वे विभागाने 2019 मध्ये तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार हा हायस्पीड रेल्वे मार्ग नारायणगाव–संगमनेर–अकोले–सिन्नर असा प्रस्तावित होता. त्या अनुषंगाने संबंधित भागातील जमिनीचे अधिग्रहणही करण्यात आले होते. मात्र, अलीकडे या प्रकल्पात बदल करून अकोले तालुका वगळण्यात आल्याचे आणि सुधारित मार्ग नारायणगाव–संगमनेर–नाशिक असा सुचवण्यात आल्याचे समोर आले आहे. या बदलामुळे अकोले तालुक्यासह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
प्रकल्पातील बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला, ही गंभीर बाब पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. सध्या प्रकल्प अहवालात झालेल्या बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासकीय पातळीवर नेमकी कोणती प्रक्रिया सुरू आहे, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गात नारायणगाव येथील जीएमआरटी (GMRT) रेडिओ टेलिस्कोप केंद्राशी संबंधित तांत्रिक अडचणी असल्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी काहीवेळा भूमिका मांडल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, या तांत्रिक अडचणींच्या आडून मूळ आराखड्यातील महत्त्वाचा अकोले तालुका वगळला जाणे अन्यायकारक असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, प्रकल्पाची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, तसेच 2019 च्या मूळ प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी ठाम मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा केवळ वाहतुकीचा विषय नसून, संगमनेर–अकोले–सिन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासाशी जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे मूळ मार्ग कायम ठेवूनच प्रकल्प राबवावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





