best news portal development company in india

कल्याण-अहमदनगर महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! सिमेंट मिक्सरने इको कारला चिरडले; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर…

SHARE:

प्रतिनिधी ठाणे
ठाणे:कल्याण-अहमदनगर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. म्हारळ गावाजवळील रायते पुलावर एका भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मारुती इको कारला समोरून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, त्यातील ८ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातात चक्काचूर झालेली इको कार


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताग्रस्त इको कार (क्र. MH ०४ WH ४८७३) कल्याणवरून प्रवाशांना घेऊन मुरबाडच्या दिशेने जात होती. ५ आसनी क्षमता असलेल्या या कारमध्ये चालकासह तब्बल १२ प्रवासी कोंबून भरले होते. ही कार रायते पुलावरून जात असताना समोरून अत्यंत वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने (क्र. MH ४६ BF ५३११) कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचे इंजिन आणि समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला. कारमधील प्रवासी आतमध्येच अडकून पडले.


या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या ८ दुर्दैवी प्रवाशांमध्ये ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की अनेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून, टिटवाळा पोलीस ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
स्थानिकांची मदतीसाठी धाव, पोलिसांकडून बचावकार्य
अपघाताचा आवाज प्रचंड मोठा होता, तो ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कटर आणि इतर साहित्याचा वापर करून कारचा पत्रा कापून आत अडकलेल्यांना बाहेर काढले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ प्रवाशांना तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जखमींमध्येही महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
या भीषण अपघातामुळे कल्याण-मुरबाड मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. ५ आसनी कारमध्ये क्षमता नसतानाही १२ प्रवासी भरले गेले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून चालणाऱ्या अवैध वाहतुकीवर आरटीओ आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने गतिरोधक बसवावेत आणि वेगमर्यादेचे पालन व्हावे, यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई