प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
एकीकडे संपूर्ण देश भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतानाच, दुसरीकडे सिन्नरमध्ये एका गरिबाचे हक्काचे घर वाचवण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवघ्या २ लाखांच्या कर्जापोटी २० लाखांचे घर जप्त झाल्याने गेल्या दीड वर्षांपासून रस्त्यावर आलेल्या वराडे कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आज मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सिन्नर तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील व वराडे कुटुंबियांनी ‘भर उन्हात’ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सिन्नर येथील संजय वराडे आणि निशाताई वराडे या कुटुंबाने ‘जना फायनान्स’ (Jana Finance) कडून कर्ज घेतले होते. वराडे कुटुंबाच्या दाव्यानुसार, केवळ २ लाख रुपयांच्या थकीत रकमेसाठी फायनान्स कंपनीने त्यांचे २० लाख रुपये किमतीचे घर आणि घरातील सर्व संसार जप्त केला आहे. यामुळे हे कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून बेघर झाले असून हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकत आहे.
यावेळी बोलताना शरद शिंदे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “दोन लाखांसाठी २० लाखांचे घर जप्त करणे हा कुठला कायदा आहे? एक तर मुदत वाढवून द्या किंवा घराच्या किमतीतून कर्ज वजा करून उरलेली रक्कम कुटुंबाला परत द्या. मात्र, इथे गरिबांचे ऐकणारे कोणीही नाही. सरकार एकीकडे गरिबांच्या कल्याणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे वित्त संस्था गरिबांना देशोधडीला लावत आहेत. हे कसले गरिबांचे सरकार?”
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, ज्यांनी देशाला समता आणि न्यायाचा अधिकार दिला.

याच दिनाचे औचित्य साधून आंदोलकांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “आम्हाला आमचे घर परत द्या,” ही एकच आर्त हाक वराडे कुटुंबाकडून दिली जात आहे.
तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या शरद शिंदे पाटील तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी,संजय वराडे व निशाताई वराडे बाधित कुटुंब शिवाजी गुंजाळ पिंटू शिंदे, चिंधु गुंजाळ भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जोपर्यंत वराडे कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि घराचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार ‘आम आदमी पार्टी’ने व्यक्त केला आहे. आता प्रशासन आणि संबंधित फायनान्स कंपनी यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आंदोलनात पदाधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले आहेत...


Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




