प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर:तालुक्यातील पश्चिम भागातील घोरवड गावात एक धक्कादायक घटना घडली असून, शौचालयास जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला बिबट्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र सखोल शोधमोहीमेनंतर बिबट्याचा संशय निरर्थक ठरला असून, मुलीचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
घोरवड येथील शांताराम हगवणे यांची मुलगी कुमारी वैष्णवी शांताराम हगवणे (वय १७, इयत्ता नववी) ही दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता शौचालयास जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूला शोध घेतला. परिसरात कुठेही मुलगी दिसून न आल्याने पालकांची चिंता वाढत गेली आणि अखेर मुलगी बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले.
ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून शोधकार्य सुरू केले. रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत आजूबाजूचा परिसर पिंजून काढण्यात आला. घोरवड परिसरात बिबट्याचा वावर कायम असतो, त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र ग्रामस्थ, सिन्नर पोलीस स्टेशन व वन विभागाच्या संयुक्त पथकाने ऊस, टोमॅटो, मका, गहू पिके, जंगली झुडपे, विहिरी, नदी, नाले व बंधारे येथे संपूर्ण रात्रभर शोध घेतला असता कोणताही ठोस पुरावा मिळून आला नाही.
मुलगी कुठेही आढळून न आल्याने बिबट्याचा संशय फोल ठरला असून, आता मुलगी बेपत्ता झाल्याचे गूढ अधिकच वाढले आहे. अवघ्या काही मिनिटांत मुलगी गायब कशी झाली?
तिला कोणी फूस लावून नेले का?
कोणाची तिच्यावर नजर होती का?
की ती स्वतःहून दिशाभूल होऊन परत येऊ शकली नाही?
अशा अनेक प्रश्नांनी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेनंतर सिन्नर पोलीस स्टेशनने तपासाची दिशा बदलून नव्याने तपास सुरू केला आहे. विविध तांत्रिक साधनांच्या मदतीने, लोकेशन ट्रॅकिंगसह सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुलीचे वडील शांताराम हगवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “बिबट्याचा संशय आता निरर्थक ठरला असून, पोलीस यंत्रणा वेगाने तपास करत आहे. आम्हाला आमची मुलगी लवकरात लवकर सापडेल, अशी आशा आहे.”
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घोरवडसह संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे. बेपत्ता झालेल्या वैष्णवी हगवणे हिचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





