कोपरगाव | प्रतिनिधी प्रकाश शिंदे
कोपरगाव: जि.अहिल्यानगर मौजे माहेगाव देशमुख येथून कुंभारी शिव रस्त्याच्या दिशेने वन विभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर वाळू वाहतूक अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हे गाव विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे यांचेच असूनही, संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, शिर्डीचे प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी, कोपरगाव तहसीलदार तसेच वनाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने दिली. आंदोलनही करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन व वाळू माफिया यांच्यात संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वन विभागाच्या हद्दीतून सुरू असलेल्या या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली असून, यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वन्य प्राणी गावात शिरण्याची शक्यता वाढली आहे. याच रस्त्याने शाळेतील लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टरमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून दडपशाही व दादागिरी केली जात असल्याने अनेक नागरिक उघडपणे विरोध करण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. “अधिकाऱ्यांनी ठरवले तर एक वाळूचा खडाही हलू शकत नाही; मात्र येथे सर्व काही संगनमताने सुरू आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर नवनाथ पांडुरंग वाघ (सामाजिक कार्यकर्ते, माहेगाव देशमुख), प्रकाश गोविंद शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, कारवाडी), किशोर आसाराम मिसाळ (दहेगाव बोलका) तसेच ग्रामस्थांनी आमदार आशुतोष दादा काळे यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करावी आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच त्या ठिकाणी प्रामाणिक व इमानदार रात्रंदिवस पथक नेमावे, ऑनलाइन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 28 जानेवारी 2026 (बुधवार) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोपरगाव येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





