प्रतिनिधी : एवन न्यूज महाराष्ट्र
मीरा-भाईंदर परिसरात ऑनलाइन रिक्षा बुकिंग सेवेशी संबंधित चालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रॅपिडो अॅपवरून आलेली रिक्षा बुकिंग स्वीकारून प्रवाशाला घेण्यासाठी गेलेल्या एका रिक्षाचालकाला चौघा अज्ञातांनी बेदम मारहाण करत चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारे २४ वर्षीय सचिन यादव हे रिक्षाचालक असून ते रॅपिडो या ऑनलाइन प्रवासी सेवा अॅपद्वारे प्रवाशांना सेवा देतात. शनिवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर परिसरातील वेलकर पेट्रोल पंपाजवळून रिक्षा बुक झाल्याची सूचना त्यांना मिळाली. नियमित प्रवासी असल्याचे समजून त्यांनी काही मिनिटांत संबंधित ठिकाणी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर रिक्षा बुक करणाऱ्या तरुणासोबत आणखी तीन जण उभे होते. त्यांनी आपणच रिक्षा बुक केल्याचे सांगून चालकाला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर अचानक चौघांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी चालकाच्या खिशातील सुमारे ७०० रुपये रोख रक्कम लुटली.
यानंतर आरोपींनी चालकाच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली. मोबाईल अनलॉक करण्यास भाग पाडत ऑनलाइन व्यवहाराद्वारे आणखी २ हजार रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतरित करून घेतल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत चालकाने काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. रविवारी कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात ही टोळी रॅपिडोसह इतर ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या चालकांना लक्ष्य करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशाच प्रकारे आणखी काही लुटीच्या घटना घडल्या आहेत का, याचाही तपास सुरू असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे ऑनलाइन बुकिंगवर सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्रीच्या वेळेस निर्जन ठिकाणी मिळणाऱ्या बुकिंगची खातरजमा करणे, संशयास्पद प्रवाशांपासून सावध राहणे आणि अडचण आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





