प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वाढता वावर आणि त्यातून उद्भवणारा मानवी–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वन विभाग आता पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला सुमारे ८ कोटी २६ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक ‘हायटेक’ रेस्क्यू सामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून, या साहित्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
जिल्ह्यातील ऊस पट्ट्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. अशा परिस्थितीत केवळ नुकसानभरपाई देणे पुरेसे नसून, संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग सक्षम होणे अत्यावश्यक असल्याचे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. शासनाने यापूर्वीही पावणेसात कोटी रुपयांची मदत दिली असून, आता या नव्या साधनसामग्रीमुळे वन विभागाची कार्यक्षमता आणि प्रतिसादक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या हायटेक रेस्क्यू सामग्रीमध्ये अत्याधुनिक रेस्क्यू वाहने, अंधारात पाहण्यासाठी नाईट व्हिजन गॉगल्स, थर्मल ड्रोन, डार्क गन, ट्रॅप कॅमेरे यांचा समावेश आहे. यासोबतच, रेस्क्यूदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खास संरक्षक जॅकेट्स, जंगलात वापरण्याचे मजबूत बूट आणि फायबरच्या ढाली देण्यात आल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांचे रेस्क्यू अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रभावीपणे करता येणार आहे.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले,
“बिबट्याचा वाढता वावर ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत शासनाने नुकसानभरपाई दिली आहेच, मात्र हा संघर्ष मुळापासून कमी करण्यासाठी वन विभागाला सक्षम करणे गरजेचे होते. आज मिळालेल्या आधुनिक साधनांमुळे आपत्तीच्या काळात वन विभाग अधिक जलद आणि परिणामकारकपणे काम करू शकेल.”
या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी स्वतः या साहित्याची पाहणी करत त्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
या अत्याधुनिक सुविधांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी–वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह वन्यप्राण्यांचे संरक्षणही अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“एवन न्यूज महाराष्ट्र“
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





