प्रतिनिधी : निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:केंद्र शासनाच्या सहकार खात्याने नुकतेच जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण 2025 हे देशातील सहकारी क्षेत्राचे पुनर्जीवन, आधुनिकीकरण व बळकटीकरण करणारे ऐतिहासिक धोरण मानले जात आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्यात आवश्यक अनुकूल बदल करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय राज्यस्तरीय समिती स्थापन केली असून, या महत्त्वाच्या समितीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा कोपरगाव येथील समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयते यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण 2025 हे शेतकरी, लघुउद्योजक, ग्रामीण कामगार तसेच सहकारी संस्थांशी निगडित प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. सहकारी संस्थांना अधिक समावेशक, व्यावसायिक, पारदर्शक व भविष्यासाठी सज्ज बनवणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कायदेशीर सुधारणा, डिजिटायझेशन, आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक लोकशाहीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकेंद्रित विकास साधण्याचा या धोरणाचा संकल्प आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पातळीवरील 48 सदस्यीय समितीने 17 बैठका व चार प्रादेशिक कार्यशाळा घेतल्यानंतर देशभरातून प्राप्त झालेल्या 6008 सूचनांचा विचार करून राष्ट्रीय सहकार धोरण 2025 चा अंतिम मसुदा तयार केला आहे. या धोरणासाठी 10 वर्षांचा कालावधी, 16 ठोस उद्दिष्टे, 82 कृती कार्यक्रम आणि 6 मूलभूत तत्त्वांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
या धोरणाअंतर्गत सहकार क्षेत्राचा मूलभूत पाया मजबूत करणे, सहकारी संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, समाजातील सर्व घटकांना सहकार क्षेत्राशी जोडणे, सहकाराच्या नव्या क्षेत्रात विस्तार करणे तसेच सहकार वृद्धीसाठी नवीन पिढी घडवणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत राज्यस्तरीय समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, या समितीत ओमप्रकाश कोयते यांची निवड झाल्याने सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओमप्रकाश कोयते म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून सहकार कायद्यात आवश्यक ते बदल झाले नाहीत. मात्र बदलत्या काळाची गरज ओळखून सहकार कायद्यात व्यापक सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने ही उच्चस्तरीय समिती महत्त्वाचे काम करणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, विशेषतः सहकारी पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीच्या कायद्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा सुचवण्यात येणार आहेत. थकबाकी वसुली अधिक गतिमान, प्रभावी आणि पारदर्शक व्हावी यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच सहकारी संस्थांचे थकबाकीदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू नयेत, यासाठी कायदेशीर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
याशिवाय थकबाकीदारांच्या तक्रारींना सहकार खात्याने दखल घेऊ नये, अशा स्वरूपाच्या तरतुदी कायद्यात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारी पतसंस्थांच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही समितीकडून करण्यात येणार आहे.
सरकारी व सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे यासाठी डीआयसीजीसीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र समिती गठीत करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. तसेच बँकिंग क्षेत्रात ज्या पद्धतीने सिबिल रिपोर्ट अनिवार्य आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली ‘क्रॉस प्रणाली’ अनिवार्य करण्याचा प्रस्ताव कायद्यात समाविष्ट करण्याचे सुचविण्यात येणार आहे.
सहकारी पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी समता पतसंस्थेचा यशस्वी वसुली पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवावा, असे धोरण देखील या उच्चस्तरीय समितीमार्फत सुचविले जाणार असल्याचे ओमप्रकाश कोयते यांनी शेवटी सांगितले.
ओमप्रकाश कोयते यांची या महत्त्वाच्या समितीवर निवड झाल्याने सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पतसंस्था प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





