प्रतिनिधी नाशिक / एवन न्यूज महाराष्ट्र
नाशिक:प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक ‘तपोवन’ परिसरातील हजारो झाडे तोडून त्या ठिकाणी ‘माईस हब’ (प्रदर्शन केंद्र) उभारण्याच्या निर्णयावरून नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या जागरूक नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांची तातडीने बदली करण्याची किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली आहे.
नाशिक मधील तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध करण्यात येत असून प्रशासनाने तपोवन सारख्या हरित पट्ट्यात प्रदर्शन केंद्र उभारण्याचा हट्ट धरला आहे. यासाठी हजारो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. नाशिककरांच्या मते, हा निर्णय पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असून ऐतिहासिक वारसा नष्ट करणारा आहे. “आयुक्त या निर्णयावर ठाम का आहेत? यात काही मोठे ‘गौडबंगाल’ आहे का?” असा संशय नागरिकांनी निवेदनातून व्यक्त केला आहे. हे केंद्र तपोवनऐवजी अन्यत्र हलवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून नाशिककर जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करत आहेत. यात काही नागरिकांना प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले आहेत.बांधकाम विभाग पूर्णपणे निष्क्रिय असून, स्थानिक आमदारांच्या तक्रारींनंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.ट्रॅफिक, पार्किंग, गोदावरी प्रदूषण, अतिक्रमण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रदर्शन केंद्राच्या निविदेत ‘अति’ तत्परता का दाखवली जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.आम्ही नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची अपेक्षा करत आहोत. तपोवन वाचवणे म्हणजे नाशिकचा श्वास वाचवणे आहे. प्रशासनाने आपला हट्ट मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल,” असा इशारा नाशिककर नागरिकांनी दिला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला एका सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मनीषा खत्री यांच्या जागी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम किंवा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महापालिकेची अतिरिक्त जबाबदारी सोपवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात आले असून, त्यावर दत्तू बोडके, वैभव देशमुख, जगन काकडे, निवृत्ती धात्रक, श्याम गोसावी, निशिकांत पगारे, विशाल पाटील, मुकेश गांगुर्डे, राजू देसले, प्रभाकर वायचळे, देवांग जानी, अनिकेत निकाळे, दिपक भावसार, सौ. पुजा भावसार, सदिंप जोजरे, शोभाताई काळे, तल्हा शेख, वैभव रोकडे, बाळासाहेब सांगळे आणि अनेक नाशिककर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





