प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी

कोळपेवाडी: दि. 14 :- श्री सुतार यांना आज राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (2024) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील श्री सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते.

विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.
शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल श्री सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, श्री सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. श्री सुतार यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्व अलौकिक असून त्याच्या असामान्य सृजनशीलतेचा अविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवयाला मिळतो. श्री सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचीती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. श्री सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की श्री सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्यूमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या श्री सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. प्रतिभावान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले श्री सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

महाराष्ट्र आणि देशाने श्री सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की श्री सुतार हे महाराष्ट्राचा अभिमान असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्मिलेला पुतळा इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुरस्कारा मागची भूमिका विशद करुन श्री सुतार यांनी कलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सुतार परिवाराच्या वतीने श्री अनिल सुतार यांनी मनोगतात या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी श्री सुतार यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
याप्रसंगी स्वाती सुतार, सोनाली सुतार, समीर सुतार, दिवाकर शर्मा, कुलदीप मित्तल यांसह विविध अधिकारी आणि सुतार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





