प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
सिन्नर:ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा वेळेत आणि प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छतागृह व परिसर व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक ग्रामसेवकांकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भाऊसाहेब हांडोरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भाऊसाहेब हांडोरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील आरोग्य व मूलभूत सुविधांची जबाबदारी ग्रामसेवकांकडे देण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातही हा उपक्रम राबवून प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळेची नियमित पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची कमतरता, अपुरी स्वच्छतागृहे, अस्वच्छ परिसर, वीजपुरवठ्याच्या समस्या आणि आरोग्यविषयक अडचणी कायम आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना स्पष्ट आदेश देऊन शाळांमधील आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी ग्रामपंचायतीच्या निधीचा प्राधान्याने वापर करावा, शाळांची वीजबिले नियमित भरावीत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि शाळा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने सक्रिय भूमिका बजावावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, शाळांमधील सुविधा पुरविण्याच्या कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्यास विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा मिळतील, असा विश्वास भाऊसाहेब हांडोरे यांनी व्यक्त केला.
शाळांच्या विकासामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये आणि सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संदर्भातील निवेदन नुकतेच प्रत्यक्ष भेट घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना सादर करण्यात आले असून प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
ए वन न्यूज महाराष्ट्र


ए वन न्यूज महाराष्ट्र
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




