प्रतिनिधी: एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक
नाशिक : अंधश्रद्धा, दैवी शक्ती आणि गुप्तधनाच्या नावाखाली लोकांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करणाऱ्या कथित भोंदूबाबा कमलेश शिवकुमार अधिकारी याच्यासह त्याच्या पत्नीविरोधात अखेर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कारवाई शक्य झाली असून, या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये अवघ्या महिनाभराच्या अंतराने निधन झाले होते. या घटनेनंतर दोघेही मानसिक भीती आणि असुरक्षिततेत जगत होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी विविध “दैवी उपाय” करणाऱ्यांचा शोध सुरू केला. त्याचवेळी यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील कथित भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली.
दोन्ही भाऊ नाशिकमध्ये येऊन कमलेश अधिकारी याला भेटले. त्यावेळी “तुमच्या कुटुंबावर मागच्या जन्माचे पाप आहे”, “जमिनीत गुप्तधन असून त्यावर अतृप्त आत्म्यांचा वास आहे”, “आई-वडिलांचा मृत्यू हा दैवी कोपामुळे झाला” आणि “तुमच्यावरही मृत्यूयोग आहे” अशा प्रकारची भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यात आली. या मानसिक दडपणाचा फायदा घेत भोंदूबाबाने त्यांच्यावर पूर्ण प्रभाव निर्माण केला.
यानंतर या दोघा भावांना उज्जैन येथे बोलावून स्मशानभूमीत चार दिवस अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पूजांमध्ये विविध पशूंचे बळी देण्यात आले, तर “दैवी विधी”च्या नावाखाली तब्बल दीड लाख रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.
इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही. नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करण्यात आली. यामध्येही पशुबळी देण्यात आले आणि दारूला “प्रसाद” म्हणून पाजण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात या दोघांना बळजबरीने ठेवून घेतल्याचा आरोप असून, त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेत विविध प्रकारे मानसिक आणि आर्थिक शोषण करण्यात आले.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, “मठ बांधण्यासाठी जागा हवी” अशी बतावणी करून पीडितांची तब्बल दोन एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारात भोंदूबाबाची पत्नीही सक्रिय सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अखेर या पीडितांनी नाशिक येथील अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अंनिसचे कार्यकर्ते पीडितांना घेऊन थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत तातडीने तपास सुरू केला.
या प्रकरणी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. बाबासाहेब ननावरे, अनुप खैरनार, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आणि ॲड. सुशीलकुमार इंदवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पीडितांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत. दरम्यान, अशाच प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तातडीने अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





