best news portal development company in india

महाराष्ट्रात एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा; मसुदा समितीची स्थापना, राज्य ठरणार देशातील पहिले राज्य…

SHARE:

धामोरी | प्रतिनिधी : दत्तात्रय घुले

धामोरी:एकल महिलांच्या विविध सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

महिला व बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असून साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयाबद्दल साऊ एकल महिला समितीचे जिल्हा समन्वयक कारभारी गरड, मिलिंद साळवे, अशोक कुटे तसेच तालुका समन्वयक संगीता मालकर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील एकल महिलांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र धोरणाची गरज दीर्घकाळापासून व्यक्त केली जात होती.

सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे ५४ लाख एकल महिला होत्या. गेल्या १५ वर्षांत हा आकडा वाढून किमान ७० लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील एकल महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सुरक्षाविषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी व्यापक धोरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर साऊ एकल महिला समितीने या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी या विषयावर दोन बैठका घेऊन महिला व बालकल्याण विभागाला मसुदा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही एकल महिला धोरणाच्या संदर्भात विविध बैठका घेतल्यानंतर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सर्व शासकीय विभाग, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महिला प्रश्नांवर कार्यरत संस्था आणि संघटनांशी चर्चा करून ही समिती धोरणाचा मसुदा तयार करणार आहे. विविध शासकीय योजनांचे एकत्रीकरण, आवश्यक बदल आणि नवीन प्रस्तावांचा समावेश करून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे.

या धोरणामुळे एकल महिलांच्या प्रश्नांकडे शासनातील सर्व विभाग अधिक संवेदनशीलतेने पाहतील, तसेच शासन आणि समाजाच्या पातळीवर या महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एकल महिलांच्या भावना, अपेक्षा आणि गरजांचे प्रतिबिंब या धोरणात उमटेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

एकल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल राज्याच्या सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.


७० लाखांहून अधिक एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; विविध विभागांच्या योजनांचे होणार एकत्रीकरण.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई